Drone Spraying | ड्रोन द्वारे फवारणी करून अहमदनगर येथील तरुणीने मिळवला रोजगार

“ड्रोन उडवत असताना स्वतः फ्लाय करत असल्याची भावना येत असते.”

ही भावना आहे सुप्रिया नवले यांची, ज्या अहमदनगर जिल्ह्यातील मालदाड गावात राहतात आणि सध्या एक ड्रोन पायलट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीएस्सी अॅग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात ड्रोन तंत्रज्ञानाचं विशेष प्रशिक्षण घेतलं. पारंपरिक शेतीतील समस्या लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आणि आता त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग खुला करत आहेत.

Drone Spraying | ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीतील प्रवेश

ड्रोन हे मानवविरहित यंत्र असून त्याचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये केला जातो. संरक्षण, चित्रिकरण, वाहतूक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत याचा प्रभावी वापर केला जात असला, तरी शेतीसाठी हे तंत्रज्ञान फार उपयुक्त ठरत आहे. सुप्रिया नवले यांनी नोव्हेंबर महिन्यात ड्रोन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि फेब्रुवारीमध्ये त्यांना एका कंपनीकडून ड्रोनसह आवश्यक उपकरणं मिळाली.

त्यात एक इलेक्ट्रिक व्हेईकल, जनरेटर आणि बॅटरी यांचा समावेश होता. त्यांच्या या नवीन प्रवासामुळे गावातील आणि आसपासच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्याधुनिक सेवा मिळण्यास सुरुवात झाली.

Drone Spraying | ड्रोनद्वारे कीटनाशक व खत फवारणी – जलद आणि प्रभावी उपाय

सुप्रिया यांच्याकडे असलेले ड्रोन मुख्यतः पिकांवर कीटनाशक, बुरशीनाशक आणि खतांच्या फवारणीसाठी वापरले जातात. पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना वेळ आणि श्रम जास्त लागत असत, शिवाय शारीरिक कष्टही खूप पडत. मात्र, ड्रोनच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत एक एकर क्षेत्र फवारणी करता येते.

शेतकरी जेव्हा त्यांच्याकडे ड्रोनद्वारे फवारणीसाठी विचारणा करतात, तेव्हा सुप्रिया आधी सर्व साहित्य इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये ठेवतात आणि शेतात जातात. त्या सांगतात, “शेतकऱ्याच्या शेतावर पोहोचल्यावर मी आधी माझे इन्स्ट्रूमेंट्स सेट-अप करते. शेताचं सर्वेक्षण करून तिथे कोणतेही अडथळे (Obstacle) आहेत का, याची खात्री करते. यासाठी मला रिमोट कंट्रोलवर (RC) संपूर्ण दृश्य स्पष्ट दिसतं.”

Drone Spraying | ड्रोनद्वारे फवारणीचं कस होतं मॅपिंग ?

योग्य ते नियोजन केल्यानंतरच ड्रोन फवारणी केली जाते. सुप्रिया पुढे सांगतात, “सर्वप्रथम मी ज्या क्षेत्रावर फवारणी करायची आहे, त्याचं मॅपिंग करते. कॉर्नर पॉइंट्स सिलेक्ट करून स्पेसिंग, डिस्टन्स आणि अल्टिट्यूड मेंटेन करते. नंतर ड्रोनला ऑटो मोडमध्ये सेट केल्यानंतर अवघ्या सात मिनिटांत एक एकर क्षेत्रावर फवारणी पूर्ण होते.”

या पद्धतीचा उपयोगामुळे औषधा सोबत वेळही खूप वाचतो. पावसाळी वातावरण असतानाही ही प्रक्रिया अगदी जलद पूर्ण होते, त्यामुळे उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतंय ड्रोन तंत्रज्ञान

ड्रोनद्वारे फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे. शेतकरी भीमराज नवले यांनी त्यांच्या डांगर पिकावर पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फवारणी करून घेतली. ते सांगतात, “यापूर्वी आम्ही पंपाचा उपयोग करून फवारणी करत होतो. एक पंप मारायला १०-१५ मिनिटं लागत असत आणि १० पंप करायला दोन तास जायचे. पण आता फक्त १० मिनिटांत एक एकर क्षेत्रावर फवारणी होते. त्यामुळे वेळ, श्रम आणि औषधांची बचत होते.”

खास करून फवारणी करणे ऊस आणि मका यांच्यासारख्या उंचीने जास्त असलेल्या पिकांवर फवारणी करणे कठीण जाते. याशिवाय जंगलाजवळील शेतांमध्ये साप, बिबट्या अशा वन्य प्राण्यांचा धोका कायम असतो. अशा परिस्थितीत ड्रोन फवारणी हा एक सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय ठरत आहे.

Drone Spraying | ड्रोन शेतीतील आव्हाने आणि संभाव्यता

ड्रोन शेतीत वापरण्यासाठी अद्याप काही आव्हाने आहेत. डॉ. अविनाश काकडे, जे कृषी महाविद्यालय सोनई येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, ते सांगतात की, “ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रशिक्षित पायलट असणे आवश्यक आहे. शिवाय, रिमोट भागात फवारणी करायची असल्यास जीपीएस सिग्नल मिळणे गरजेचे आहे. काही ठिकाणी नेटवर्क नसल्याने समस्या निर्माण होऊ शकते. तसेच, ड्रोन पोहोचण्यासाठी योग्य रस्त्यांची उपलब्धताही गरजेची आहे.”

ड्रोन चालवण्यासाठी DGCA पोर्टलशी कनेक्ट होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे अत्यंत दुर्गम भागात याचा वापर अजूनही काही प्रमाणात मर्यादित आहे.

ड्रोन शेतीत रोजगाराची नवीन दारं उघडतंय

ड्रोनचा शेतीमध्ये वाढता वापर हा रोजगाराच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे. हे उपकरण जरी महागडे असले (सुमारे ६ ते १५ लाख रुपये), तरी अनेक शेतकरी भाडेतत्त्वावर ड्रोन वापरू शकतात.

सुप्रिया नवले या भाडेतत्त्वावर ड्रोन सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय करत आहेत. त्या सांगतात, “एक एकर फवारणी करिता आम्ही ₹ 300 घेत असतो. अजून फक्त दीड महिना झाला आहे, पण मी दिवसाला ४ ते ५ हजार रुपये कमावते.”

Drone Spraying | ड्रोन तंत्रज्ञान – शेती क्षेत्रामध्ये झालेला महत्त्वाचा बदल

पिकांवर पडणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांवर निदान करण्याकरिता आणि पिकांवर परिणामकारक औषध फवारणी करिता याचा उपयोग केला जातो. योग्य वेळी औषधोपचार केल्याने उत्पादन वाढते, औषधांचा अपव्यय टाळता येतो आणि कमी मनुष्यबळात अधिक काम पूर्ण करता येते.

अद्याप ड्रोनचा उपयोग सार्वत्रिक स्वरूपात झाला नसला, तरी भविष्यात ते आधुनिक शेतीचे महत्त्वपूर्ण साधन ठरणार आहे. पारंपरिक पद्धतींचा अवलंब करतानाच तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतकरी आपलं उत्पादन वाढवू शकतात. सुप्रिया नवलेसारख्या तरुण पिढीने हा नवा मार्ग स्वीकारला आहे आणि शेती क्षेत्रात बदल घडवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.

Leave a Comment